विधान परिषदेच्या पाच जागांसाठी येत्या ३० जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या कालच्या शेवटच्या दिवशी राजकीय वर्तुळात तांबे पिता-पुत्रांचा एक प्रकारे ड्रामा पाहायला मिळाला. नाशिक पदवीधरसाठी कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसकडून आपला अर्ज न भरता मुलगा सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेसाठी दाखल केलेला अर्ज महाविकास आघाडीकडून अर्थात कॉंग्रेसच्यावतीने भरण्यात आल्याचा दावा करण्यात आला. यासोबतच त्यांनी दुसरा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून भरलाय. तर दुसरीकडे भाजप-शिंदे गटाकडून कोणताही उमेदवार देण्यात आला नाही. याउलट तांबे कुटुंबियांच्या या ड्राम्यानंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांकडून सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं.
सत्यजित तांबेवर नाना पटोलेंचा कारवाईचा इशारा.....
Letsupp Krushi
एकंदरीत या संपूर्ण घटेनवर कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल माहिती घेऊन स्पष्टीकरण देणार असल्याचं जाहीर केलं आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर कॉंग्रेस पक्षाची भूमिका मांडलीय. पटोले म्हणाले, कॉंग्रेसचे एकनिष्ठ असलेले नाशिक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सुधीर तांबे यांनी पक्षाशी दगाफटका केला आहे. त्यांचा मुलगा सत्यजित तांबेंकडून अपक्ष उमेदवारीचा अर्ज आणि निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपकडून उमेदवार न देणं, त्यासोबतच तांबेनी भाजपचा पाठिंबा मागणे हे सर्व पूर्वनियोजित असल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच कॉंग्रेस पक्षाकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार नसल्याची घोषणा देखील नाना पटोले यांच्याकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या संपूर्ण घडामोडीचा अहवाल हायकमांडकडे पाठवण्यात आला असून आज हायकमांडकडून निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र, बंडखोर आमदारांना आम्ही पाठिंबा देणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय.

