राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं असून रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण पुढे येत असताना हे सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं बसून आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. राऊत हे सद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आज नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली.
राज्यातील सरकार गेंड्याच्या कातडीचं संजय राऊतांचं शिंदे सरकारवर टीकास्र...
Letsupp Krushi
संजय राऊत म्हणाले?
“काही दिवसांपूर्वी आम्ही नागपूरमध्ये होतो. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही तिथे उपस्थित होते. सरकारचा गोंधळ आम्हाला जवळून बघता आला. मुळात हे सरकार अस्तित्वातच नाहीये. रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत आहेत. मात्र, सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूखंडाची दोन प्रकरणे, त्यानंतर अब्दुल सत्तार यांचा जमीन घोटाळा, उदय सामंत बोगस डिग्री प्रकरण, अशी प्रकरणं बाहेर येऊनही सरकार पाण्यात बसलेल्या म्हशी सारखं होतं. जणू काही घडलंच नाही आणि विरोधी पक्षच गुन्हेगार आहे, अशा पद्धतीने काम करत होतं”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“महाराष्ट्राला इतिहास आहे. पूर्वी एखाद्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यांवर न्यायालयाने थोडे जरी ताशेरे ओढले, तरी ते राजीनामा देत होते. बॅरिस्टर अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर, अशी अनेक उदाहरणं आहेत. मात्र, एका अधिवेशनात मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आली. तेही पुराव्यासह तरीही सरकार ठंब्याप्रमाणे बसून आहे”, असेही ते म्हणाले.

